Document Actions


ग्रामीण ऊर्जा – जीवनमान सुधारण्यासाठी एक अत्यावश्यक गरज

भारतामधे, जिथं सत्तर टक्के लोक ग्रामीण भागांमधे राहतात, तिथं आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर राहायचा असेल तर ग्रामीण ऊर्जा अधिकच महत्वाची आहे.  आपल्या खेड्यांपैकी 21 टक्के खेडी आणि 50 टक्के ग्रामीण घरांचं अद्याप विद्युतीकरण झालेलं नाही.

त्याचप्रमाणं. ग्रामीण आणि शहरी भागांदरम्यान दरडोई ऊर्जेच्या वापरामधेही बरीच तफावत आहे.  उदाहरणार्थ, 75 टक्के ग्रामीण कुटुंब स्वयंपाकासाठी जळणावर अवलंबून आहेत, 10 टक्के शेण्या वापरतात आणि अंदाजे 5 टक्के LPG वापरतात, त्याउलट, 22 टक्के शहरी कुटुंब स्वयंपाकासाठी लाकूडफाटा वापरतात, अन्य 22 टक्के केरोसिन वापरतात आणि अंदाजे 44 टक्के लोक LPG वापरतात.   त्याचप्रमाणं घरातील प्रकाशासाठी, 50 टक्के ग्रामीण घरं केरोसिनवर अवलंबून असतात आणि अन्य 48 टक्के वीजेचा वापर करतात, तर 89 टक्के शहरी कुटुंबं वीजेवर अवलंबून असतात आणि अन्य 10 टक्के केरोसिन वापरतात.  स्त्रिया आपल्या दिवसातील उत्पादक वेळेतील चार तासापर्यंतचा वेळ सरपण गोळा करण्यात आणि स्वयंपाकात खर्च करतात. लहान मुलंसुध्दा सरपण गोळा करण्यात गुंतलेली राहतात. 

एखाद्या राष्ट्राच्या विकासाकरिता ऊर्जेची उपलब्धता ही महत्वाची पूर्वगरज आहे.  आपल्या जवळपास सर्व दैनंदिन कामांमध्ये ऊर्जा केंद्रस्थानी असते – स्वयंपाक, स्वच्छ पाण्याची उपलब्धता, शेती, शिक्षण, वाहतूक, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणात्मक टीकाऊपणा.

वापरल्या जाणा-या ग्रामीण उर्जेपैकी 80 टक्के ऊर्जा ही जैवभारापासून तयार केलेली असते.  त्यामुळं खेड्यांमधे आधीच लुप्त होत असलेल्या वनक्षेत्रावर प्रचंड दबाव येत आहे.  अकार्यक्षम चुलींच्या वापरामुळं सरपण गोळा करण्यात गुंतलेल्या महिला आणि बालकांच्या हालअपेष्टेत ब-याचदा भरच पडते.  भरीला, घरात स्वयंपाक करताना या चुलींमधून निघणा-या धुरामुळं महिला आणि बालकांच्या श्वसन आरोग्यावर मोठा विपरीत परिणाम होतो.

ऊर्जेचं वाढतं संवर्धन, सुधारित उर्जा कार्यक्षमता आणि नूतनीकरणीय स्रोतांव्दारे वाढीव उर्जा उत्पादन यांच्यामुळं एकंदरीत भारताला आणि विशेषतः ग्रामीण भागांना स्वयंपूर्ण समुदाय बनायला निश्चितच पुढाकार मिळेल.

ग्रामीण ऊर्जेवरील या स्थळाव्दारे प्रोत्साहनात्मक उदाहरणांसह वरील मुद्यांवर माहीती देण्याचा प्रयत्न करण्यात येतो, जेणेकरुन त्यांचा वापर करण्यास आणि निगडीत फायद्यांचा वापर करण्यास आपण उद्युक्त व्हाल.

 

Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

ही साईट पुढील मानकांनुसार आहे